२००३ मध्ये मिलिंद मेहेरेनी हिम्मत दाखवली आणि स्वतःच घर घेण्यासाठी मोट्ठी उडी मारली. मुंबईतलं स्वतःच घर हे तेव्हाही मध्यम वर्गीयांसाठीं मोठी गोष्ट होती आणि आजही आहे .
मिलिंदला खूप सल्ले मिळाले , पण काही बाबतीत साहेब खरंच कुणाच्याही बापाचं ऐकत नाही. घर घेतलं .
लग्ना आधी घराचे हफ्ते भरल्यानंतर , मिलिंदकडे काही शंभर उरत असावेत. माझ्या पगाराचा तसाही फायदा होण्यासारखाच नव्हता. नशीब लग्नाआधी मला बऱ्यापैकी नोकरी मिळाली आणि त्याच ओझं मला थोडं कमी करता आलं.
लग्न होउन घरी आले, नव्याची नवलाई संपली, आणि संसार खऱ्या अर्थाने सुरु झाला . आई नेहमी म्हणायची , तुझं लग्न झालं कि तुला " आटे दाल का भाव " कळेल . ते खरं होत .
दोघांचे तीन झालो , दुचाकी बरोबर चार चाकी आली .. पगार वाढला, खर्च वाढले, चिंता सुद्धा वाढल्या. पण ह्या घरात सगळं निभावून गेलं.
मी स्वप्नाळू , मिलिंद प्रॅक्टिकल... पण आयुष्य छान जगलो .... जगतोय.
ह्या घराने मला स्थिरता दिली , स्वातंत्र्य दिल, समानता दिली . जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जाऊ दे , पण परत यायची ओढ दिली , उब दिली .
४ भिंतीचं , अगदी सुरु होऊन संपणार माझं घर, आता थोडं मोठं दिसेल...
३ महिन्यानंतर नवीन घरात जाऊ . पण हुरहूर अगदी तशीच आहे १४ वर्षांपूर्वीची . त्या घरात पहिलं पाऊल टाकताना नवीन घर मला फ्लॅशबॅक मध्ये घेऊन जाईल का ?
नवीन घर , ह्या घरासारखं मला आपलं वाटेल का ? आपलं करेल का?
-- मीता मेहेर.
२३-०६-२०१७
No comments:
Post a Comment